नाशिकचा भोंदू अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात


Nashik’s Charlatan Ashok Kharat Taken into Custody by Shirdi Police शिर्डी (5 मे 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी नाशिकमधून ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

गंभीर गुन्ह्यांचा होणार तपास
शिर्डी पोलिसांनी अशोक खरातला नाशिक येथून ताब्यात घेतले असून त्याच्यासह त्याच्या पत्नीवर शेतकर्‍याची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीने एका शेतकर्‍याला विविध आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात आर्थिक गंडा घातला होता.



भोंदूगिरीच्या माध्यमातून विश्वास संपादन करून नंतर पैशांची उकळपट्टी केल्याचे तपासात समोर येत आहे. याशिवाय, कायद्याला हरताळ फासत बेकायदेशीर सावकारीचे जाळे उभारल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रात्रभर कसून चौकशी
आरोपी खरातला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी राहता ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. सध्या अशोक खरात शिर्डी पोलीस ठाण्याच्या कोठडीत असून रात्रभर त्याची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचे हात आहेत का, किती जणांना फसवण्यात आले आहे, आणि आर्थिक व्यवहारांचा खरा आकडा किती आहे, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. या कारवाईमुळे भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या फसवणूक साखळीवर मोठा आघात बसण्याची चिन्हे आहेत तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !