चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपड्यातील महिलेचे निधन
Woman from Chopda on Char Dham pilgrimage passes away चोपडा (5 मे 2026) : चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपडा येथील प्रतिभा नारायण बोरोले यांचे उत्तराखंडमध्ये दुर्दैवी निधन झाले. बद्रीनाथचे दर्शन होण्याच्या आदल्या दिवशीच त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रतिभा बोरोले (59) असे मृताचे नाव आहे.
अचानक प्रकृती खालावली
धार्मिक भावनेतून चारधाम यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्या सोबत चोपड्यातील एकूण 16 भाविकांचा गट होता. यात्रेदरम्यान सर्वांनी केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले होते. या यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणून बद्रीनाथ मंदिराचे दर्शन ठरले होते. मात्र, त्या दर्शनाच्या आधीच त्यांची तब्येत अचानक खालावली. रात्रीच्या वेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे सहप्रवाशांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न केले.


प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना केदारनाथच्या खाली असलेल्या चमोली परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र त्यांची तब्येत सुधारली नाही. अखेर 1 मे रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे चोपडा शहरात शोककळा पसरली आहे.