आरोग्य सेवेतील योगदानाची दखल : भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे परिचारीकांचा सन्मान


भुसावळ (14 मे 2026) :जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे पालिका दवाखान्यात परिचारिकांचा विशेष गौरव करण्यात आला. आरोग्य सेवेत अहोरात्र कार्यरत राहून रुग्णांची सेवा, काळजी व समर्पणभावाने काम करणार्‍या परिचारिकांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, आरोग्य सभापती मेघा वाणी, वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्तीफलटणकर, डॉ.जैन, नगरसेविका सोनल महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व परिचारिकांना हळदी-कुंकू, ओटी व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दवाखान्याचे वातावरण भावनिक व कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेले होते.







परिचारीकांच्या कामाचे कौतुक
प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांनी परिचारिकांच्या कार्याचे कौतुक केले. कोरोनासारख्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता परिचारिकांनी रुग्णसेवा केली. त्यांच्या समर्पणामुळे अनेकांचे प्राण वाचले असून समाज त्यांच्या कार्याचा सदैव ऋणी राहील, असे त्यांनी सांगितले.

रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा ः रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनीही परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून काम करणार्‍या परिचारिका समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या सेवेमुळे आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होत आहेत.

या उपक्रमामुळे परिचारिकांच्या चेहर्‍यावर समाधान व आनंद दिसून आला. मिळालेल्या सन्मानामुळे त्यांचे मनोबल वाढल्याच्या भावना अनेक परिचारिकांनी व्यक्त केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सदस्य अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !