भुसावळात बीएलओंचे विशेष प्रशिक्षण : मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेला गती
मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यावर भर ; ECI NET अॅपद्वारे माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन
भुसावळ (15 मे 2026) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मंगळवारी (दि. 13 मे 2026) तापी सभागृह, उपविभागीय कार्यालय भुसावळ येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी श्रीमती नीता लबडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षणाला भुसावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व बीएलओ उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान मतदार यादी पुनरीक्षण, मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे मतदान यादीतून वगळण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “स्थलांतरित झाल्यानंतर मतदान यादीत नाव कमी न होणे ही संबंधित मतदारांची जबाबदारी असून, ज्या ठिकाणी वास्तव्यास असाल त्याच ठिकाणी मतदान नोंदणी असणे आवश्यक आहे,” असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.






तसेच मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. SIR 2002 मधील मतदार यादीशी विद्यमान मतदारांची मॅपिंग करण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
मतदारांनी स्वतःहून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ECI NET अॅप्लिकेशनच्या माध्यमातून BOOK CALL सुविधा, मतदान ओळखपत्रातील दुरुस्ती, पत्ता बदल, जन्मतारीख व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी फॉर्म क्रमांक 8 ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने बीएलओंकडे सादर करण्याची माहिती देण्यात आली.
मतदारांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी बीएलओंनी सक्रिय भूमिका बजावावी, तसेच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व संबंधितांनीही बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. या वेळी श्री. हिरालाल मूलचंदानी यांनी बीएलओंना SIR संदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण कार्यक्रमास तहसीलदार नीता लबडे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, खतीब तडवी, श्याम गिरी, सचिन पाटील यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Related

कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव

