धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई : जबरी चोरी प्रकरणी दोघे गजाआड
91 हजारांचा मुद्देमाल हस्तगत : आरोपींनी दोन गुन्ह्यांची दिली कबुली
Action by Chalisgaon Road Police in Dhule : Two Behind Bars in Robbery Case धुळे (15 मे 2026) : धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करत दोन आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शरीम सलीम मणियार (29, रा. कबीरगंज, वडजाई रोड, धुळे) आणि शेख मोहसीन नुरुद्दीन शेख (25, रा. कबीरगंज, वडजाई रोड, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांनी चाळीसगाव रोड हद्दीत दोन गुन्ह्यांची कबुली दिली.
मोबाईल हिसकावून केला पोबारा
29 एप्रिल 2026 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक तीनवरील वडजाई रोड उड्डाण पुलाजवळ फिर्यादी व साक्षीदार यांचे मोबाईल अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी 4 मे 2026 रोजी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.






दरम्यान, 4 मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे शोध पथक गस्त घालत असताना बडजाई रोड उड्डाण पुलाजवळ दोन संशयित एका व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून लुटत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता आरोपी मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून एक हजार 200 रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे 90 हजार रुपये किमतीचे सात मोबाईल फोन असा एकूण 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 115/2026 व 01/2026 हे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
यांनी केली कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक हरिशचंद्र पाटील तसेच हवालदार अविनाश बाघ, अतीक शेख, निलेश चव्हाण, संदीप वाघ, सुर्यकांत भामरे, शोएब बेग, सारंग शिंदे, सचिन पाटील, वैराट आदींच्या पथकाने केली.


