आठ महिन्यानंतरही सातारा गॅझेटचा जीआर न निघाल्याने संताप ; मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा
Outrage mounts as the GR regarding the Satara Gazette remains unissued even after eight months; Manoj Jarange once again warns of renewed agitation. नवी दिल्ली (15 मे 2026) : मुंबईच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढतो असे आश्वासन देण्यात आले मात्र त्यावर आठ महीने जाले तरी काहीही कारवाई करण्यात आली नसल्याने मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील ?
मनोज जरांगे जालन्यात बोलताना म्हणाले, ज्यांना कुणबी पुरावा सापडला त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचे वाटोळे केले, अशी टीका जरांगे यांनी केली आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा आंदोलनाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. जरांगे पुढे बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाला जास्तीत जास्त त्रास देण्याचे काम सुरू आहे. मते आणि नेते मराठ्यांची लागतात, पण मराठा समाजातील मुले मोठी होऊ नयेत, अशी भूमिका दिसते, अशीही टीका त्यांनी केली आहे.






आता आम्हीच पाहतो हा जीआर कसा निघत नाही
मुंबई आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला त्यावेळी सरकारचे कौतुक केले होते. त्यानंतर 108 प्रमाणपत्रांचे वितरण जाले. मात्र सातारा संस्थानाच्या गॅझेटबाबत दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाही. आता आम्हीच पाहतो हा जीआर कसा निघत नाही, असा थेट इशाराच जरांगे यांनी दिला आहे तसेच कुणबी नोंदी सापडूनही संबंधितांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक मराठा कुटुंबे अडचणीत आहेत. शिंदे समिती रेकॉर्ड शोधण्याच्या प्रक्रियेत अपेक्षित गती नसल्याने समाजात नाराजी वाढत असल्याचेही जरांगे यांनी नमूद केले.
पुढील आंदोलनाची तारीख शनिवारी जाहीर करणार
मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. आंदोलनाची पुढील तारीख शनिवारी जाहीर केली जाईल, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आमची लेकरंही आम्हाला सोन्यासारखी आहेत. सरकारने आणखी बळी घेऊ नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले आहे.


