भुसावळात मारुतीरायाला 501 किलो आंब्यांचा भव्य नैवेद्य
डीवायएसपी केदार बारबोले यांच्या हस्ते महाआरती : दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
भुसावळ (17 मे 2026) : शहरातील मारुती मंदिरात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाचा 121 वा सप्ताह अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या विशेष सप्ताहाचे औचित्य साधत श्री हनुमानजींना तब्बल 501 किलो आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला होता. हा अनोखा नैवेद्य आणि मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी शहरासह परिसरातील भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात अलोट गर्दी केली.
अडीच वर्षांपासून सामूहिक हनुमान चालिसा पठण
गेल्या 30 महिन्यांपासून (अडीच वर्षे) मंदिरात अविरतपणे सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. या 121 व्या सप्ताहानिमित्त आयोजित विशेष सोहळ्याची सुरुवात पहाटेपासूनच झाली. सकाळी सामूहिक हनुमान चालीसा पठणाला सुरुवात झाली, उपस्थित शेकडो भाविकांच्या सुरात सूर मिसळल्याने संपूर्ण मंदिर परिसर आणि आसपासचा परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. या सुवर्ण महोत्सवी सप्ताहाच्या मुख्य महाआरतीचा मान डीवायएसपी केदार बारबोले यांना मिळाला. त्यांच्याहस्ते मारुतीरायाची विधीवत महाआरती करण्यात आली. याप्रसंगी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि वैष्णव परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.गेल्या अडीच वर्षांपासून हा भक्तीचा यज्ञ अविरतपणे सुरू ठेवणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले.
महाप्रसादाचे वाटप
हनुमानजींना 501 किलो आंब्यांचा छप्पन भोग सदृश नैवेद्य दाखवल्यानंतर,दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना या आंबा प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर समितीतर्फे बुंदी, खिचडी-भात आणि केळींच्या महाप्रसादाचे सध्दा आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
आयोजकांचा धर्मजागृतीचा संकल्प
हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी मारुती मंदिर समिती, वैष्णव परिवार आणि स्थानिक सेवेकर्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. समाजात धर्मजागृती व्हावी आणि तरुण पिढीला संस्कृतीची जोड मिळावी,यासाठी हा सामूहिक पठणाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.भविष्यात हा उपक्रम आणखी मोठ्या आणि व्यापक स्वरूपात राबवला जाईल,असा संकल्प आयोजकांनी यावेळी व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत मंदिरामध्ये भाविकांची वर्दळ सुरू होती.










