भुसावळ महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार : ‘ब्लॅक स्पॉट’ ची पाहणी
अपर पोलीस अधीक्षकांकडून पाहणी : ‘नही’ला उपाययोजनांचे दिले निर्देश
Police Initiative to Prevent Accidents on Bhusawal Highway : Inspection of ‘Black Spots’ भुसावळ (17 मे 2026) : नशिराबाद ते घोडसगाव दरम्यानच्या महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून वाढत्या अपघातांना ब्रेक लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जळगावचे नूतन अपर अधीक्षक संदीप गावीत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मुक्ताईनगर ते भुसावळ उपविभागातील तब्बल 15 हून अधिक ’ब्लॅक स्पॉट’ची (अपघात प्रवण क्षेत्र) प्रत्यक्ष पाहणी केली व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (नही) अधिकार्यांना सोबत घेऊन अपघात रोखण्यासाठी तातडीने स्ट्रक्चरल बदल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते.
वाढत्या अपघातांना लागणार ब्रेक
गेल्या काही महिन्यांत साकेगाव, दीपनगर आणि मुक्ताईनगर परिसरातील महामार्गावर भीषण अपघात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी भुसावळ व मुक्ताईनगर उपविभागातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी आणि नहीच्या वरिष्ठ तंत्रज्ञांसोबत एक संयुक्त दौरा केला. यावेळी डीवायएसपी केदार बारबोले, निरीक्षक राहुल वाघ, निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह नहीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी नशिराबादपासून ते मुक्ताईनगरातील घोडसगावपर्यतच्या मार्गावरील ब्लॅक स्पॉटची पहाणी केली. यावर उपाय करण्यासाठी नहीच्या अधिकार्यांना त्या दृष्टीने सूचना केल्यात. भर उन्हात अधिकारी रस्त्यावर येऊन ब्लॅक स्पॉटची पहाणी केली.
या ठिकाणांची केली पाहणी
महामार्गावरील जिओ पेट्रोल पंप,आदेश टी-पॉईंट (साकेगाव), वांजोळा चौफुली, पटेल टी-पॉईंट, तेली पेट्रोल पंप, सरगम गेट, दिपनगर, कपिल वस्ती, महारुद्र हॉटेल समोर, हरताळा फाटा, मुक्ताईनगर चौफुली, प्रवीण पेट्रोल पंप आणि तिगरे फाटा या ठिकाणच्या भौगोलिक रचनेची आणि तांत्रिक त्रुटींची पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे प्रत्येक ब्लॅक स्पॉटला थांबून त्यावर चर्चा करून तेथे काय उपाय योजना करावी, याबाबत सूचना केल्यात. त्यांची नोंद करून घेतली.
स्ट्रक्चरल बदलासह तातडीचे उपचार
महामार्गावरील काही वळणे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि रस्त्याची चुकीची ठेवण यामुळे अपघात होत असल्याचे निरीक्षण या दौर्यात नोंदवण्यात आले. याबाबत नहीच्या अधिकार्यांना तातडीने डागडुजी आणि रचनेत बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच, एखादा अपघात घडल्यास जखमींना ‘गोल्डन अवर’ मध्ये (पहिल्या तासात) उपचार मिळण्यासाठी स्थानिक पोलिसांनी काय नियोजन करावे, याच्या विशेष टिप्सही गावित यांनी प्रभारी अधिकार्यांना दिल्या.
कायद्याचा नवा दृष्टिकोन
नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.रस्त्यावरील असुरक्षित परिस्थितीमुळे होणारे मृत्यू टाळणे ही प्रशासनाची संयुक्त जबाबदारी असून,त्यादृष्टीने या मोहिमेकडे पाहिले जात आहे.
रस्त्याची रचना सुधारणार
महामार्गावरील अपघात कमी करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही तर रस्त्याची रचना सुधारणेही गरजेचे आहे. नही विभागाला काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. जनतेनेही सुरक्षित प्रवासाचे नियम पाळावेत, असे आवहान अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी केले.










