भुसावळमध्ये पाळीव प्राण्यांची गणना करून परवाना मोहीम राबवा : डॉ.नितु पाटील यांची मागणी


भुसावळ (19 मे 2026) : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर तसेच नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर भुसावळ नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्व पाळीव कुत्रे, मांजरी आदी प्राण्यांची गणना करून त्यांना परवाना देण्याची विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी भाजप वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ नितू पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रभारी नगराध्यक्ष सौ.शैलेजाताई नारखेडे यांना निवेदन दिले आहे.

अशी आहे निवेदनातील मागणी
निवेदनात म्हटले आहे की, 24 एप्रिल रोजी नारायण नगर परिसरातील तारकेश झोपे (1) या बालकावर मोकाट कुत्र्याने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाच्या शरीरावर तब्बल 30 टाके पडले होते. उपचार सुरू असताना रेबीज या जीवघेण्या आजारामुळे मुंबई येथे 12 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडल्याचा आरोपही डॉ. पाटील यांनी निवेदनात केला आहे.




शहरात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी नगरपालिकेने पाळीव प्राण्यांच्या नोंदणी व ‘पेट लायसन्स’ मोहिमेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरपालिका कायदा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार घरात कुत्रे किंवा मांजरी यांसारखे पाळीव प्राणी ठेवण्यासाठी परवाना आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

या मोहिमेद्वारे शहरातील पाळीव प्राण्यांची संपूर्ण माहिती संकलित होण्यास मदत होईल. तसेच रेबीज प्रतिबंधक लसीकरण, वार्षिक परवाना नूतनीकरण, नसबंदी, सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांना साखळीत ठेवणे आणि त्यांनी घाण केल्यास ती साफ करण्याची मालकाची जबाबदारी यांसारख्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यासोबतच शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंती डॉ. नितू पाटील यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !