मासेमारीसाठी गेलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
मुक्ताईनगर (19 मे 2026) : मासेमारीसाठी गेलेल्या 35 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा परिसरात घडली. अचानक फिट्स (झटका) आल्याने युवकाचा तोल जाऊन तो पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
फिटस् आल्याने गेला तोल
योगेश शांताराम कटोणे (बेलदार) हे रविवारी दुपारी जुने उचंदा गावाजवळील पूर्णा नदीत मासेमारीसाठी गेले असता मासेमारी करीत असताना अचानक त्यांना फिट्स आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह आणि अचानक घडलेल्या प्रकारामुळे त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.



घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने युवकाला बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे हलविण्यात आला.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास राजकुमार चव्हाण करीत आहेत. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.






