मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला टोपली : फेकरीत स्मार्ट मीटरमुळे नागरिक हैराण
15 ते 20 हजारांची बिले येत असल्याचा ग्राहकांचा संताप
फेकरी, ता.भुसावळ (22 मे 2026) : परिसरात सध्या वीज वितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. या स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक घरांमध्ये पूर्वी दोन ते तीन हजार रुपये येणारे वीज बिल आता थेट 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला टोपली
राज्याचे मुख्यमंत्री यांनी अनेक ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन स्मार्ट मीटर बसविण्याबाबत काळजीपूर्वक निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याची चर्चा असतानाही फेकरी येथे मात्र त्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतरच अचानक बिलात मोठी वाढ झाली. सामान्य माणसाने एवढे बिल भरायचे कसे? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.



विशेष म्हणजे, काही नागरिकांनी वीज कार्यालयात जाऊन तक्रारी केल्यानंतरही त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप आहे. उलट बिल भरावेच लागेल असा दबाव टाकला जात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणात काही वायरमन व संबंधित अधिकारी हे कंपनीचीच बाजू घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्याऐवजी अधिकारी आणि वायरमन हे स्मार्ट मीटर कंपनीचे समर्थन करत आहेत. स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
फेकरी परिसरातील वाढत्या संतापामुळे येत्या काळात नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







