यावल शहरातील हडकाई नदीच्या पुलावर कठडे हवेत : अपघाताची भीती
यावल (25 मे 2026) : यावल शहरातून बाबानगरात जाणार्या रस्त्यावर हडकाई नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पुलावर सुरक्षेसाठी आवश्यक असलेले कठडे नसल्याने वाहनचालक आणि पादचार्यांसाठी धोका निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर असताना या पुलावरील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन पुलावर मजबूत कठडे उभारावेत, अशी मागणी होत आहे.
अपघात होण्याची भीती
शहरातून बाबानगराकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर हडकाई नदी आहे. या नदीच्या पात्रात काही वर्षांपूर्वी पूल उभारण्यात आला होता. शहरातील विविध भागांना जोडणारा हा पूल नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग बनला आहे मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षेसाठी आवश्यक असलेले कठडेच नसल्याने पुलावरून ये-जा करताना वाहनधारकांना आणि पादचार्यांना मोठा धोका पत्करावा लागत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना थेट नदीचे पात्र असल्याने थोडीशी निष्काळजीपणा किंवा वाहनाचा तोल गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते.


अपघाताचा धोका अधिक
पुलाच्या पलीकडे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शाळा, मोठे विद्यालय, सुतगीरणी तसेच कोरपावली जाणारा हा रस्ता आहे. सकाळ-संध्याकाळ या पुलावरून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची ये-जा सुरु असते. अशा परिस्थितीत सुरक्षेची कोणतीही भक्कम व्यवस्था नसणे ही चिंतेची बाब ठरत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या पुलावरील धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसात पुलावर पाणी साचणे, रस्ता निसरडा होणे आणि दृश्यमानता कमी होणे अशा परिस्थितीत कठडे नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक तीव्र होऊ शकतो. विशेषतः शाळकरी मुले, दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या कठड्यांची उभारणी अद्याप झालेली नाही त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेल, नागरिकांनी वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.






