हे सात दिवस संपले, पण भागवत मनात कायम राहील : भुसावळात भागवत सप्ताहात रमेशानंद महाराज
अश्रूंनी आणि हरिनामाच्या गजरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा भावपूर्ण समारोप
“These seven days have come to an end, but the Bhagavat will remain forever in our hearts”: Rameshānand Maharaj at the Bhagavat Week in Bhusawal. भुसावळ (25 मे 2026) : गेल्या सात दिवसांपासून भक्ती, ज्ञान आणि अध्यात्माच्या सागरात भाविकांना चिंब भिजविणार्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा अत्यंत भावनिक वातावरणात समारोप झाला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर हरिनाम होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जय श्रीकृष्णच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
मनाने मुक्त होणे हीच खरी मुक्ती
कथा वाचक रमेशानंद महाराज यांनी निरूपण करताना उपस्थित भाविकांच्या मनाला स्पर्श करणारे विचार मांडले. ते म्हणाले, मनाने मुक्त होणे हीच खरी मुक्ती आहे. आत्मा कधीच बांधला जात नाही, मात्र मन विषय, वासना, मोह, प्रलोभन आणि विकारांमध्ये अडकते. ज्या क्षणी मन या सर्वांपासून मुक्त होते, त्याक्षणी माणूस खर्या अर्थाने परमेश्वराच्या जवळ पोहोचतो. परीक्षित राजाच्या जीवनाचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, मृत्यू समोर उभा असतानाही परीक्षित घाबरला नाही, कारण त्याने मन जिंकले होते. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. त्यांच्या या शब्दांनी अनेक भाविक भावूक झाले.


रमेशानंद महाराज पुढे म्हणाले की, भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला दिलेला अंतिम उपदेश हा प्रत्येक माणसाच्या जीवनाला दिशा देणारा आहे. श्रीमद् भागवत ही केवळ कथा नसून जीवन कसे जगावे, नाती कशी जपावीत, धर्मासाठी कसे उभे राहावे आणि प्रेम कसे करावे याचे अमृत आहे.
समारोपप्रसंगी जोशी महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. हे सात दिवस कसे संपले हे कळालेच नाही. कथा ऐकतांना जणू वृंदावन आपल्या समोर उभे राहिले होते. भगवान श्रीकृष्णांच्या लिला, त्यांचे आई-वडिलांवरील प्रेम, भक्तांवरील माया आणि धर्मासाठी केलेले कार्य प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेले, असे ते म्हणाले.
ग्रंथ दिंडीने वेधले लक्ष
कथा समाप्तीनंतर श्रीमद् भागवत ग्रंथाची दिंडी काढण्यात आली. टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या गजरात भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते. अनेकांनी ग्रंथपूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. महिलांच्या डोळ्यांत अश्रू होते तर युवकांमध्येही भक्तीचा उत्साह दिसून येत होता. महाआरतीनंतर पुन्हा लवकरच अशी भागवत कथा आयोजित व्हावी अशी भावना भाविकांनी व्यक्त केली. अखेरीस महाप्रसाद वितरणाने या भक्तिमय सप्ताहाची सांगता झाली.






