धुळे अपघातातील मृतांची नावे आली समोर : विरुद्ध दिशेने धडकलेल्या डंपरने घेतले सहा जणांचे बळी


Names of the Deceased in Dhule Accident Revealed : Dumper Driving Against Traffic Claims Six Lives धुळे (26 मे 2026) : मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅफिक जाम असल्याचा संदेश मिळाल्यानंतर बेपर्वा डंपर चालकाने विरुद्ध दिशेने वाहन दामटल्यानंतर हा डंपर एका माल ट्रकवर जावून आदळला व या अपघातानंतर दोन तासानंतर पुन्हा पाठीमागून आलेली भरधाव ट्रॅव्हल्स मालट्रकवर आदळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. मन विषन्न करणारा हा अपघात धुळ्याजवळील आर्वी शिवारात घडला. मृतांमध्ये धुळे, मालेगाव, बडवाणी भागातील मृतांसह स्थानिक टोलवर काम करणार्‍या कर्मचार्‍याचा समावेश आहे. या अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

यांचा ओढवला मृत्यू
भीषण अपघातात डंपर चालक मनोज प्रकाश नरवाळ (40, रा.टोकडे, ता. मालेगाव), गणेश हिरामण थोरात (28, रा.शेलारवाडी, धुळे), लक्झरी चालक जावेद जहांगीर खान (25, रा.बडवाणी), सहचालक अमीर सगीर कुरेशी जय (29, रा.ठिकरी, जि.बडवाणी), सहचालक गुलमोहंमद मजरुहद्दीन शेख (29, रा.राजपूर, जि.बडवाणी आणि बचावकार्यात मदत करणारा योगेश पंडीत मंडलिक (34, रा.सोयगाव, ता.मालेगाव, जि.नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.

पहाटेच्या सुमारास अपघात
वाळूची वाहतूक करणारा डंपर चालक मनोज नरवाळ हा मालेगावच्या दिशेने नेत असताना आर्वी शिवारात महामार्गावर विकासकामांमुळे वाहतूक जाम असल्याचे कळताच त्याने लळींग घाटापासून विरुद्ध दिशेने वाहन दामटले व याचवेळी मालेगावकडून धुळ्याकडे वेगात येणार्‍या एका मालट्रकवर डंपर आदळला. दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाल्यानंतर मनोज कॅबीनमध्ये अडकल्याने मयत झाला तर ट्रक चालकाने वेळीच उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. मध्यरात्री 1.45 च्या सुमारास गस्तीवरील पोलीस व टोलनाक्यावरील पथक मदतीसाठी धावल्यानंतर मदत कार्य सुरू असतानाच पहाटे 3.15 वाजेच्या सुमारास मालेगावकडून भरधाव येणारी लक्झरी अपघातग्रस्त मालट्रकवर आदळल्याने टोलवरील कर्मचार्‍यासह सहा जण यात ठार झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !