यावल नगरपालिकेत नगराध्यक्षांकडून कर्मचार्यांची झाडाझडती
कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ हजर राहण्याच्या सक्त सूचना ; उशिरा येणार्यांची लागणार गैरहजेरी
यावल (28 मे 2026) : यावल नगरपरिषदेमध्ये बुधवारी नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी सकाळच्या सत्रात कार्यालयात जाऊन आस्थापनेवरील व कार्यालयातील हजर कर्मचार्यांची तातडीने मीटिंग बोलावली. यामध्ये किती कर्मचारी हजर, किती गैरहजर, कोण किती वाजता आले याची माहिती घेत रजेविना गैरहजर अधिकारी, कर्मचार्यांची चांगलीच त्यांनी झाडाझडती घेतली. काही अधिकारी हे सुटी न टाकता गेल्या काही दिवसापासून सतत गैरहजर होते अशातील एका अधिकार्याची त्यांनी चांगलीच कान उघडणी करीत त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कार्यालयात कर्मचार्यांनी सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत नियमित हजर रहावे अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. जो उशिरा येईल त्याच्या गैरहजेरीची नोंद घेतली जाईल, अशी तंबी नगराध्यक्षांनी दिली आहे.
कर्मचार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ
यावल नगरपालिकेत बुधवारी सकाळी दहा वाजता नगराध्यक्ष छायाताई पाटील या नगरसेवक अतुल पाटील, सागर चौधरी, पराग सराफ, निसार मोमीन यांच्यासह दाखल झाल्या. यावेळी त्यांनी त्काळ हजर कर्मचार्यांची बैठक त्यांनी घेतली. यात कोण-कोणते अधिकारी व कर्मचारी गैरहजर आहे, कोणता कर्मचारी रजेचा अर्ज न देता कार्यालयात आला नाही अशा सर्वांची त्यांनी अचानक तपासणी केली व अधिकारी-कर्मचार्यांची चांगली झाडाझडती घेतली. यामध्ये अभियंता संग्राम शेळके हे गेल्या दहा दिवसापासून गैरहजर होते व ते आजदेखील आले नसल्याने नगराध्यक्षांनी त्यांना कॉल करून त्याची चांगलीच कान उघाडणी केली व त्यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. एकूणच जे काही कर्मचारी उशिरा आले व जे गैरहजर होते त्यांना त्यांनी प्रारंभी आपल्या कामात आणि कामावर येण्याच्या वेळेत बदल करून नियमित कार्यालयीन वेळेत करण्यात हजर राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.
उशिरा येणार्यांची आता गैरहजेरी लागणार
कर्मचार्यांची कामाची कार्यालयीन वेळ हा सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत असून या वेळेत दुपारची जेवणाची वेळ वगळता सर्व कर्मचार्यांनी कार्यालयात हजर राहावे, कोणताही कर्मचारी हा न विचारता रजेचा अर्ज न देता जर गैरहजर राहिला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशा सक्त सुचना त्यांनी केल्या. याप्रसंगी मुख्याधिकारी निशिकांत गवई, कक्ष अधीक्षक विशाल काळे, उमर कच्छी, समीर खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष मो. हकीम मो. याकूब, गोलू माळी सह आदींची उपस्थिती होती.
उशिरा येणार्यांची गैरहजेरीची नोंद
नगराध्यक्ष स्वतः आता आपल्या कक्षात व काही नगरसेवक हे दररोज ठरल्यानुसार सकाळी दहा वाजता नगरपालिकेत हजर राहतील व दहा वाजता सर्व अधिकारी कर्मचारी देखील कार्यालयात हजर हवेत, जो उशिरा येईल त्याची थेट गैरहजेरीची नोंद घेतली जाईल, अशा सक्त सूचना सर्व अधिकारी व कर्मचार्यांना नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी केल्या आहेत, नागरिकांना त्यांची कामे करून घेण्याकरिता प्रत्येक टेबलावर अधिकारी हा हजरच पाहिजे, असे त्यांना बजावले आहे.
प्रत्येक आस्थापनात रिक्त पदांची घेतली माहिती
प्रसंगी मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडून नगराध्यक्ष यांनी आस्थापनेच्या विविध क्षेत्रातील ज्या कर्मचार्यांची पदे रिक्त आहे अशा कर्मचार्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली आहे, नगरपालिकेत प्रत्येक विभागात किती व्यक्ती काम करतात, किती लोकांची आवश्यकता आहे व किती पद रिक्त आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊन जिल्हास्तरावर पाठपुरावा करून आस्थापनेवरील रिक्त पदे भरले जातील, असे देखील याप्रसंगी त्यांनी सांगितले.

