सोनगीर पोलिसांची कारवाई ; जबरी लूट करणारी टोळी जेरबंद

सहा आरोपी निष्पन्न ; दोघांना अटक ; व्यापार्‍याची चैन हिसकावून झाली होती 1.20 लाखांची लूट


Action by Songir Police: Robbery Gang Apprehended धुळे (28 मे 2026) : व्यापार्‍याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून रोख रक्कम लुटणार्‍या टोळीचा सोनगीर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सहा आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

असे आहे लूट प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, 21 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी वासुदेव दयाराम माळी (रा. कापडणे, ता. जि. धुळे) हे त्यांच्या ओमनी वाहनातून ड्रायफ्रूटचा माल घेऊन रामी गावाकडे जात होते. रामी गावाच्या अलीकडे निर्जनस्थळी दोन मोटारसायकलींवर आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांचा पाठलाग करून वाहन अडविले.

आरोपींनी फिर्यादीच्या डोळ्यांवर मिरची पावडर फेकून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व 1 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली. याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी निष्पन्न केले.

सहा आरोपींचा सहभाग : दोघांना अटक
पोलीस तपासात या जबरी चोरीत राहुल पुंडलिक पाटील (रा.बोरिस, ता.धुळे), विठ्ठल वामन भोळे (रा.आकुर्डी, पुणे), साई उर्फ भटू रवींद्र माळी (रा.जुने धुळे), मनोज पाटील व गुन्ह्याचा कट रचणारे निलेश सुनील पाटील (रा.कापडणे, ता.धुळे), जॅकी साधुसिंग तनवाणी (रा. कुमारनगर, धुळे) यांचा सहभाग निष्पन्न झाल. त्यातील .राहुल पुंडलिक पाटील व निलेश सुनील पाटील यांना अटक करण्यात यश आले तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ताकटे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ताकाटे, पोलीस अंमलदार जगदीश अहिरे, विजयसिंग पाटील व रोहन वाघ आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !