देवगिरी बँकेतील 5.33 कोटींचे घोटाळा प्रकरण : चाळीसगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नातेवाईकाला अटक
Devgiri Bank ₹5.33 Crore Scam Case: Relative of Former Chalisgaon MP Unmesh Patil Arrested चाळीसगाव (28 मे 2026) : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांचे नातेवाईक प्रशांत वाघ यांना पोलिसांनी देवगिरी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. वाघ यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेत झालेल्या पाच कोटी 33 लाख 85 हजार 356 रुपयांच्या बहुचर्चित कर्ज फसवणूक प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली.
असे आहे प्रकरण
कंपनीचे कर्ज आणि एनपीए ‘उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या नावाने देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेतून कोट्यवधी रुपयांचे औद्योगिक कर्ज घेण्यात आले मात्र, ठरलेल्या मुदतीत या कर्जाची परतफेड न झाल्याने हे खाते थकीत (एनपीए) झाले.
गहाण मशिनरीची विक्री
बँकेने कर्ज वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असता कंपनीच्या संचालकांनी बँकेकडे तारण (गहाण) ठेवलेली कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री (मशिनरी) बँकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता संगनमताने परस्पर विकून टाकली. या व्यवहारामुळे बँकेचे 5.33 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. याप्रकरणी बँकेचे चाळीसगाव शाखा व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
माजी खासदारांसह चौघांवर गुन्हे दाखल
या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी नोव्हेंबर 2025 मध्ये माजी खासदार उन्मेश पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात माजी खासदार उन्मेश पाटील यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला असून, मी या कर्जाचा केवळ जामीनदार होतो, राजकीय सूडबुद्धीने मला यात अडकवण्यात आले आहे, असा दावा त्यांनी केला होता.
या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना पोलिसांनी अखेर या कंपनीशी संबंधित आणि माजी खासदारांचे नातेवाईक असलेले आरोपी प्रशांत वाघ यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. गहाण मशिनरी नेमकी कुठे आणि कोणाला विकली? तसेच या पैशांचा गैरव्यवहार कसा झाला? याचा शोध पोलीस घेत आहेत.

