जळगाव जिल्ह्यात वाळू तापली : लाखोंची वाळू जप्त ; अवैध वाळू माफिया धास्तावले
Sand Heats Up in Jalgaon District: Sand Worth Lakhs Seized; Illegal Sand Mafia Rattled जळगाव (29 मे 2026) : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननासह वाहतुकीविरोधात पोलिसांनी गुरुवारी विविध ठिकाणी धडक कारवाई करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. एमआयडीसी, एरंडोल, पिंपळगाव हरेश्वर आणि धरणगाव पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित वाहनांसह वाळू जप्त करण्यात आल्याने माफिया धास्तावले आहे.
कारवाईने खळबळ
पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत ज्ञानेश्वर साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुकेश शिवदास सोडे (40, रा.वाघनगर, जळगाव) हा डंपर (क्रमांक एमएच 19 सीवाय 4439) मध्ये विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी सुमारे 10 हजार रुपये किंमतीची पाच ब्रास वाळू तसेच आठ लाख रुपये किंमतीचा डंपर असा एकूण 8 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा तपास हवालदार समाधान टहाकळे करीत आहेत.
एरंडोल येथे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह वाळू जप्त
एरंडोल पोलीस ठाण्यात गुरनं 97/2026 अन्वये बीएनएस कलम 303(2), 3(5) सह गौण खनिज विकास व विनियमन अधिनियम तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडके बु॥ ते खर्ची रोडवरील जय मल्हार वॉटर सप्लायसमोर गुरुवारी सकाळी 11.10 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नथ्थु कोळी यांनी कारवाई केली. यावेळी एक निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (एमएच 19 बीजी 5590) व ट्रॉलीतून अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सुमारे दीड ब्रास वाळूसह ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण 4 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक सुनिल भास्कर मोरे आणि मालक भिमराज त्र्यंबक कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव हरेश्वर येथे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुरनं 250/2026 अन्वये बीएनएस कलम 303(2) तसेच मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोजे गावाबाहेर पिंपळगाव हरेश्वर रोडवर गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पोलिसांनी टाटा कंपनीचा डंपर (एमएच 20 सीटी 6829) अडवून तपासणी केली. यावेळी अंदाजे 4 ब्रास अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी 10 लाख रुपये किंमतीचा डंपर आणि 20 हजार रुपये किंमतीची वाळू असा एकूण 10 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक अतुल मदनसिंग परदेशी आणि शुभम गुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलिसांचीही कारवाई
धरणगाव पोलीस ठाण्यात गुरनं 208/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) सह खाण आणि खनिज अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतखेडा फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक एमएच 19 ईव्ही 1652 च्या ट्रॉलीतून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड केले. पोलिस कॉन्स्टेबल विनोद उत्तम चौधरी यांच्या फिर्यादीवरून प्रेमराज जिजाबराव पाटील (रा. वाकटुकी, ता. धरणगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे दीड ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून पुढील तपास पोना जितेंद्र भदाणे करीत आहेत.
आरोपींना अद्याप अटक नाही
चारही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अवैध वाळू वाहतुकीविरोधातील कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

