भुसावळ तालुक्यात भीषण अपघात : विवाहिता ठार, पती गंभीर


Horrific Accident in Bhusawal Taluka : Married Woman Killed, Husband Critical भुसावळ (29 मे 2026) : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुली परिसरात गुरुवार, 28 मे रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिचे पती गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने येणार्‍या ओमनी वाहनाने अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

पापड व्यवसाय करून घरी परतताना दुर्घटना
वराडसीमच्या आरती उमाकांत भारंबे (40) या पती उमाकांत भारंबे यांच्यासोबत खेडी (जळगाव) येथून पापड तयार करून अ‍ॅक्टिव्हा (एम.एच.19 डी.आर.3241) दुचाकीने सुनसगावमार्गे बेलव्हाळ फाट्याकडून वराडसीकडे घरी जात असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गोजोरे गावाकडून नशिराबादच्या दिशेने भरधाव येणार्‍या ओमनी (एम.एच.04 ई.डी.562) वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. उपसरपंच एकनाथ सपकाळे, राहुल नारखेडे तसेच मंदाबाई भय्या कोळी यांनी जखमी दाम्पत्याला रिक्षाने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना गंभीर दुखापतीमुळे आरती भारंबे यांचा मृत्यू झाला. उमाकांत भारंबे यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी धाव
संबंधित वाहन मलकापूरहून नंदुरबारकडे जात असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच सुनसगावचे पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल धिरज मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !