यावलला कोम्बिंग ऑपरेशन : आठ गुरांची सुटका ; चार जणांवर गुन्हे दाखल


यावल (30 मे 2026) : शहरात बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे यावल पोलिसांच्या पथकाने मुस्लिम बहुल भागात कोम्बिंग ऑपरेशन केले. यात डांगपुरा, मन्यार वाडा, कुरेशी मोहल्ला भागातून कत्तलीच्या उद्देशातून बांधून ठेवलेल्या आठ गोवंशाची सुटका करण्यात आली. पंचनाम्याकरीता सर्व गोवंश हे गोशाळेत पाठवण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिसात चौघांविरोधात प्राणी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या कारवाईने खळबळ
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार मोहन तायडेसह पथकाने शहरातील मुस्लिम बहुल भागात यात प्रामुख्याने डांगपुरा, मन्यार वाडा, कुरेशी मोहल्ला या भागात कोंबींग ऑपरेशन राबवले. या त्यांनी कत्तलीच्या उद्देशातुन बांधून ठेवलेल्या आठ गोवंशाची सुटका केली.

ही कारवाई बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी पहाटे करण्यात आली. या कारवाईत शहरातील संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला तर या प्रकरणी यावल पोलिसात हवालदार मोहन तायडे यांच्या फिर्यादी वरून सैय्यद रशीद उर्फ लच्छू कुरेशी, सैय्यद आसिफ कुरेशी, सैय्यद अन्सार कुरेशी व सैय्यद निसार कुरेशी या चार जणांविरूध्द प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.

गोवंश संदर्भात पोलिसांना माहिती द्या
शहर व तालुक्यात कुठे ही जर कत्तलीच्या उद्देशातून गोवंश लपवलेले असेल, किंवा अवैध गोवंशाची वाहतूक केली जात असल्यास यावल पोलिसांना माहिती द्यावी, माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !