भुसावळातील गुन्हेगारांवर ‘मोका’सारखी होणार कारवाई ; पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले

वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना ः गुन्हेगारांची लवकरच होणार झाडाझडती


भुसावळ (30 मे 2026) : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर हद्दपारीसह मोकासारखी कारवाई केली जाणार आहे या शिवाय गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होणार्‍या सराईत गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची हजेरी घेतली जाणार असून समुपदेशनाच्या माध्यमातून कानउघाडणी करून भविष्यातील गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जे गुन्हेगार ऐकण्याच्या स्थितीत नसतील, त्याच्या विरूध्द हद्दपारी, मोक्का सारख्या कायद्याचा वापर केला जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले.

गुन्हेगाराला लागणार चाप
शहरातील अनेक गुन्हेगार हे कायद्यापेक्षा आपण मोठे असल्याचा आव आणत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. किरकोळ वादांपासून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांपर्यंत काही जण सातत्याने सक्रिय असल्याने पोलिसांनी आता त्यांच्यावर थेट नियंत्रण ठेवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलीस व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात येणार आहे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार असून कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित भागातील गुन्हेगारांची माहिती संकलीत करण्यात येत आहे.पोलिसांकडून प्रत्येकाची स्वतंत्र नोंद ठेवून त्यांचे वर्तन, हालचाली आणि पूर्व इतिहास तपासला जाणार आहे.

हद्दपार, मोक्कांचे प्रस्ताव
विशेषतः ज्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत किंवा वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग आढळून आला आहे, अशा व्यक्तींविरुद्ध हद्दपार प्रस्ताव, मोकासारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे प्रस्ताव आठवडा भरात तयार होण्याची प्रक्रीया होणार आहे.

कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कुणालाही कायद्यापेक्षा मोठे समजले जाणार नाही. शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व कठोर उपाययोजना सातत्याने राबविण्यात येतील, असे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !