मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी : दरोड्याच्या तयारीतील बीडच्या टोळीतील सदस्यांना बेड्या
Muktainagar police’s big achievement: members of a gang from Beed who were preparing for a robbery were handcuffed मुक्ताईनगर (30 मे 2026) : बीड जिल्ह्यातून दरोड्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर परिसरात आलेल्या टोळीतील सदस्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी 29 रोजी पहाटेच्या सुमारास पकडले आहे. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड, दोरी, मोबाईल फोन आणि बनावट क्रमांक प्लेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले मुक्ताईनगरात ?
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील घोडसगाव पुलावर शनिवारी पहाटे कार (एम.एच.19 बी.यु.6695) या स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच वाहन चालकासह दोन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला मात्र पाठलाग करून दोघांना पकडण्यात यश आले.
संशयीत बीड जिल्ह्यातील : दरोड्याचे साहित्य जप्त
पोलिसांनी दोघांकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने वाहनाची कसून झडती घेण्यात आली. या झडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, एक दोरी, लोखंडी रॉड, मिरची पावडर, मोबाईल फोन आणि एक बनावट क्रमांक प्लेट (एम.एच.14 एम.झेड.7023) आढळून आली. एकूण पाच लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याचा प्राथमिक अंदाज तपासातून व्यक्त करण्यात येत आहे.
कुख्याताविरोधात राज्यभरात गुन्हे
तपासादरम्यान पसार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध राज्यातील विविध जिल्ह्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बीड, अहिल्यानगर, बुलढाणा, पुणे, नाशिक, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर वाहन चोरी, दरोडा आणि दरोड्याच्या तयारीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे त्याच्याविरुद्ध यापूर्वी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्याला बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत गायकवाडविरुद्ध बीड शहर पोलीस ठाणे, त्र्यंबकेश्वर, खुलताबाद, सिडको संभाजीनगर, एमआयडीसी अहिल्यानगर, पाथर्डी, उमरगा, यवत आणि तोफखाना या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या टोळीच्या हालचालींमागे मोठे गुन्हेगारी नेटवर्क असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पाच संशयीताविरोधात गुन्हा
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात पोलीस कर्मचारी असीम तडवी यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत विष्णू वाघ, कैलास कारभारी घोडके (दोन्ही रा.चिंचोली आडगाव, ता.छत्रपती संभाजीनगर), प्रशांत उर्फ परशूराम मोहन गाय (एकनाथवाडी, मुंगूसवाडी, ता.मुक्ताईनगर), शहादेव व शहादेव (पूर्ण नाव नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रकांत व कैलास यांना अटक करण्यात आली तर पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
