भुसावळातील 20 हजारांचे लाच प्रकरण : खाजगी पंटर कोठडीत तर पसार पोलीस उपनिरीक्षकाचा कसून शोध सुरू


Bhusawal Bribe Case (₹20,000) : Private Tout in Custody; Intensive Search Underway for Absconding Police Sub-Inspector भुसावळ (30 मे 2026) : 20 हजारांच्या लाच मागणी प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे व खाजगी पंटर सलीम हकीम कुरेशी (46, कुरेशी मोहल्ला, बोदवड) यांच्याविरोधात जळगाव एसीबीने शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात खाजगी पंटर सलीम कुरेशी यास अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल असलेले उपनिरीक्षक सांगळे हे रजेवर असल्याची माहिती असून एसीबीकडून त्यांचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असे आहे लाच प्रकरण
भुसावळातील तक्रारदार व त्याच्या मित्राचे एकासोबत 28 मार्च 2026 रोजी खडका चौफुली येथे पाच हजार रुपये मागितल्यानंतर वाद झाले व किरकोळ हाणामारी झाली. त्यानंतर उभयतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताच्या शोधासाठी घरी गेलेल्या उपनिरीक्षकाने संशयीत व तक्रारदाराच्या पत्नीकडे गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 30 हजारांची मागणी केली व याबाबतची तक्रार तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे 7 एप्रिल रोजी केली.

लाचेची मागणी मात्र संशय न आल्याने स्वीकारली नाही लाच
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यात गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे यांनी 30 हजारांची मागणी करून 20 हजारात तडजोड केल्याचे स्पष्ट झाले व सापळा रचण्यात आला मात्र लाच रक्कम देण्यासाठी तक्रारदार गेल्यानंतर संशय आल्याने सापळा यशस्वी झाला नाही मात्र एसीबीने बोदवडचा संशयीत व खाजगी पंटर सलीम कुरेशी यांचे संभाषण रेकॉर्ड केले व लाच मागणीचा अहवाल शुक्रवारी आल्यानंतर एसीबीच्या पथकाने खाजगी पंटर सलीम कुरेशी (बोदवड) याला अटक केली तर संशयीत सांगळे हे सध्या सीक रजेवर असल्याने त्यांचा एसीबीने कसून शोध सुरू करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !