मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
The Government’s Stance Is Solely to Deliver Justice to the Maratha Community : Chief Minister Devendra Fadnavis अहिल्यानगर (31 मे 2026) : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा निघाल्यानंतर चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच आमच्या शासनाची राहिली असल्याचे सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते तथा मंत्री चोंडी येथे उपस्थित आहेत. चोंडीचा विकास आराखडा मंजूर झाला असून आचारसंहिता असल्याने काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले नसल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासने दिली आहेत, ती तुमच्या समोर आहेत. कुठेही मागे आश्वासन दिले नाही. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी ते वाचून दाखवले आहे त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच आमच्या शासनाची राहिलेली आहे. त्यानुसारच कारवाई केलेली आहे.
चोंडीचा विकास आराखडा मंजूर
राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या देशात ज्यांनी हिंदू अस्मिता जागृत ठेवली. ज्यांनी अनेक आक्रमानांनंतर सनातन धर्म जीवंत ठेवला, ज्यांनी लोकशासन आणि लोकप्रशासन कसे असू शकते याचे आदर्श उदाहरण छत्रपती शिवरायांच्यानंतर दिले अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो होतो.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वर्षी आपण त्यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली, महाराष्ट्रातील जेवढी शक्तिस्थळ आहेत त्यांचे पुनर्निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केला आणि जे निर्णय घेतले ते सर्व कामे आम्ही सुरू केली आहेत. इथला देखील विकास आराखडा हा मंजूर झाला आहे. प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वात याचे सर्व काही गोष्टी पूर्ण केल्या आहेत मात्र आचारसंहिता सुरू असल्याने त्याचे भूमिपूजन करता आले नाही, आचारसंहिता झाल्यानंतर भूमिपूजन करू, असे आश्वासन दिले आहे.
