रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडातील आरोपीवर आरोप निश्चिती
भुसावळ (1 जून 2026) : रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात चार अल्पवयील भावंडांची हत्या झाल्याची घटना 15 ऑक्टोबर 2020 रोजी घडली होती. या हत्याकांड प्रकरणी अटकेतील संशयीत महेंद्र सीताराम बारेला यास भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने दोषी धरले आहे. संशयीताला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात येते ? याबाबत मंगळवार, 2 रोजी निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चार भावंडांची कुर्हाडीने हत्या
रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. बोरखेडा परिसरातील शेतातील घरात झोपलेल्या चार अल्पवयीन बहिण भावंडांची कुर्हाडीने आरोपी बारेला हत्या केली होती. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचारही करण्यात आला होता.
सहा वर्षांपासून आरोपी कोठडीत
या खटल्यात आरोपी महेंद्र बारेलाचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तो अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे. कोविड-19 महामारीमुळे काही काळ खटल्याचे कामकाज संथ गतीने सुरू होते मात्र त्यानंतर या प्रकरणावर जलदगतीने सुनावणी घेण्यात आली.
वैज्ञानिक पुरावे ठरले निर्णायक
या खटल्यात प्रत्यक्ष साक्षीदार नसतानाही पोलिसांनी भक्कम वैज्ञानिक पुरावे सादर केले. घटनास्थळी मिळालेल्या रक्तनमुने, डीएनए चाचण्या व इतर तांत्रिक तपासांच्या आधारे आरोपीविरुद्ध ठोस पुरावा उभा करण्यात आला. एकूण 28 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. या खटल्याचे कामकाज जलदगती न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय आर.यादव यांच्या न्यायासनापुढे चालले.
आज आरोपीला सुनावणार शिक्षा
चारही मुलांच्या हत्येसह पोस्कोमध्ये आरोपी बारेला दोषी आढळला असून सोमवार, 1 जून रोजी आरोपांवर निश्चिती झाली तर आता आरोपीच्या शारीरीक व मनस्थितीबद्दल डॉक्टरांकडून अहवाल मागवण्यात आला आहे शिवाय संशयीत सहा वर्षांपासून कारागृहात असल्याने वागणुकीचा अहवालही मागवण्यात आला असून मंगळवारी न्यायालय आरोपीला नेमकी काय शिक्षा सुनावते ? याकडे लक्ष लागले आहे. आरोपीतर्फे अॅड.सत्यनारायण रामफळ पाल तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल डी.निकम यांनी कामकाज पाहिले व सोमवारी ते भुसावळ न्यायालयात उपस्थित होते.



