तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर : 32 आरोपींना बेड्या ; 12.16 लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त


मुंबई (2 जून 2026) : अन्न व औषध प्रशासन विभागाचे नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच धडक कारवायांना सुरूवात केली आहे. या विभागाने राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेत आतापर्यंत 40 ठिकाणी छाप्यांद्वारे 32 आरोपींना बेड्या ठोकल्या तर एकूण 24 गुन्हे दाखल करण्यात आले व सुमारे 12.16 लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रशासनाच्या या धडक आणि वेगवान कारवाईमुळे अवैधरित्या गुटखा विक्री करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

तर कुणालाही सोडणार नाही !
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुन्हेगारांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या कोणालाही सोडले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी यापुढील काळात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, 25 मे रोजी तुकाराम मुंढे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या 21 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीतील ही तब्बल 25 वी बदली असून, पदभार स्वीकारताच त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि शिस्तबद्ध कार्यशैलीची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

19 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा अवैध साठा जप्त
पुणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. आंबेगाव आणि खेड तालुक्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून प्रशासनाने गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी आणि इतर संशयित अन्नपदार्थांचा तब्बल 19 लाखांहून अधिक किमतीचा अवैध साठा जप्त केला. या कारवाईदरम्यान काही आस्थापना कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असल्याचेही उघडकीस आले असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा अपप्रवृत्तींविरोधात यापुढेही कडक मोहीम सुरूच राहील, असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

मिसलिडिंग जाहिरातींवरही कारवाईचा इशारा
बड्या ब्रँड्सची आश्वासने आणि मिसलिडिंग जाहिरातींना भुलून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आता आक्रमक झाले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या कंपन्यांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !