महाविद्यालयीन तरुणीवर चौघा नराधमांचा दहा महिने अत्याचार


कोल्हापूर (3 जून 2026) : ओळखपत्र बनवण्यासाठी आलेल्या तरुणीची फोटोग्राफरशी ओळख झाल्यानंतर त्याने महाविद्यालयीन तरुणीचे फोटो काढले व नंतर हे फोटो एडीट करून सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला व नंतर हा प्रकार आपल्या अन्य तीन मित्रांना सांगितल्यानंतर त्यांनीदेखील वेळोवेळी तरुणीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील या घटनेप्रकरणी चौकडीविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली.

चार नराधमांना अटक
आदित्य बाजीराव शेटके (24, रा.खिंडी व्हरवडे, ता.राधानगरी), रणजीत संभाजी मुधोळकर (21, रा.सोळांकुर, ता.राधानगरी), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (24, रा.राधानगरी), विक्रम रामचंद्र पाटील (22, रा.बुजवाडे, ता.राधानगरी) अशी अटकेतील नराधमांची नावे असून कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

नेमकं प्रकरण काय?
मुख्य आरोपी आदित्य शेटके याच्या मामाचा सोळांकुर येथे फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे. मामाने हा व्यवसाय आपला भाचा आदित्यला चालवण्यासाठी दिला होता. या व्यवसायाच्या निमित्ताने आदित्यची ओळख पीडित तरुणीशी झाली. ओळखपत्र बनवून देण्याच्या बहाण्याने आदित्यने तरुणीला मुदाळतिट्टा येथे बोलावून घेतले आणि नंतर मुरगुड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेले. तिथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला.

तरुणी दलदलीत फसली
पहिल्या अत्याचारानंतर मुख्य आरोपी आदित्यने या तरुणीची ओळख त्याचा मित्र रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली. रणजितनेही फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत पीडितेला गिरगाव, कात्यायनी आणि कोल्हापूर परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर हा ससेमिरा थांबला नाही; रणजितने तिची ओळख प्रणवगिरी पालकर याच्याशी करून दिली. प्रणवगिरीने तिला कारमधून एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रणजितने तिची ओळख विक्रम रामचंद्र पाटील याच्याशी करून दिली. विक्रमने तुझे पाठीमागील सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो, असे खोटं आश्वासन देऊन तिला पाचगाव येथील लॉजमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.

चौघांनी मिळून गेल्या 10 महिन्यांत तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. आरोपी पीडित तरुणीला आळीपाळीने विविध ठिकाणी घेऊन जात तिच्या शरीराचे लचके तोडत होते. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं अखेर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीनं कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !