पावसाळा उंबरठ्यावर मात्र भुसावळात रखडली नालेसफाई
पहिल्याच पावसात पाणी घरात शिरण्याची भीती ; जून महिना उजाडला तरी कामांना मुहूर्त नाही
भुसावळ (3 जून 2026) : शहरातील पावसाळापूर्व नालेसफाईची कामे यंदा पूर्णपणे रखडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. पहिल्याच पावसात शहरातील सखल भागात पाणी घरात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणारी नाल्यांची सफाई, खोलीकरण व गाळ काढण्याची कामे यंदा जून महिना सुरू झाला तरीही सुरूच झाली नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील सर्वच नाले तुंबले
भुसावळ शहरातील मध्यवर्ती भागातून तसेच विविध वसाहतींमधून येणारे सांडपाणी मुख्य नाल्याद्वारे शहराबाहेर सोडले जाते. मात्र, शहरातील प्रमुख नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खडका रोड परिसरापासून मुख्य नाल्यापर्यंत जाणारा नाला सध्या पूर्णपणे गाळ, कचरा आणि साचलेल्या घाणीने भरून गेला आहे. नाल्याची खोली कमी होऊन रस्त्याच्या पातळीइतकी झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याऐवजी थेट परिसरात साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याचप्रमाणे अमरदीप टाकी परिसरातून नागरी वस्तीतून जाणारा नाला देखील गंभीर अवस्थेत आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी व इतर जलवनस्पती वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडथळला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रोफेसर कॉलनी ते बाजारपेठ या मार्गावरील नाल्याची स्थितीही काही वेगळी नाही. येथेही मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचलेला असून, पावसाळ्यात हा भाग जलमय होण्याची शक्यता आहे.
मुख्य बाजारपेठेतून जाणारा नाला तर प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल व इतर कचर्यामुळे अक्षरशः तुंबला आहे. या नाल्यातील अडथळ्यांमुळे पावसाचे पाणी मोकळेपणाने वाहू शकणार नाही, परिणामी बाजारपेठेत पाणी साचून व्यापारावरही परिणाम होण्याची भीती व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
शहरातील बहुतांश मोठ्या नाल्यांमध्ये अशीच परिस्थिती असून, सर्वत्र कचरा आणि गाळ साचलेला आहे. यामुळे मान्सूनपूर्व तयारी पूर्णपणे अपुरी असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, ही कामे दरवर्षी नियोजनबद्ध पद्धतीने मे महिन्यात पूर्ण केली जात होती मात्र यंदा निविदा प्रक्रिया व प्रशासकीय मंजुरीला विलंब झाल्याने कामे थांबली असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे या कामांना विलंब होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळापूर्व नालेसफाई ही अत्यावश्यक सेवा असल्याने जिल्हाधिकार्यांकडून विशेष परवानगी घेऊन ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
आचारसंहितेची अडचण : लवकरच होणार कामे
भुसावळ शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत. विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे काही प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी पावसाळ्यापूर्व ही कामे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्यांकडून विशेष परवानगी घेण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. शहरातील सर्व प्रमुख नाले, उपनाले यांची तातडीने सफाई व खोलीकरण करून पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासन कटीबद्ध असल्याचे पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे म्हणाल्या.



