धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : घरफोड्या करणारी कुख्यात टोळी जाळ्यात
धुळ्यातील त्रिकूटाकडून तीन गुन्ह्यांची उकल : एक लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त
Major Operation by Dhule Crime Branch: Notorious Burglary Gang Nabbed धुळे (3 जून 2026) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने घरफोड्या करण्यात माहीर असलेल्या अट्टल रेकॉर्डवरील त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली देत सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल तसेच इतर चोरीचा मुद्देमालासह एक लाख 14 हजार 780 रुपयांचा ऐवज काढून दिला आहे.
कुख्यात आरोपींना अटक
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सलमान जावेद खान (18, विटाभट्टी, देवपूर, धुळे), आफताब शरिफ शेख उर्फ अप्पू (26, विटाभट्टी, देवपूर धुळे) व हरीष उर्फ सनी कैलास चौधरी (23, विट्टाभट्टी, देवपूर, धुळे) यांचा समावेश आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
1 जून 2026 रोजी पश्चिम देवपूर हद्दीतील अमोल देविदास पाटील (अक्षय कॉलनी, धुळे) यांच्या बंद घरातून एक लाख 45 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व इतर साहित्य चोरीला गेले होते. समांतर तपासात एलसीबी निरीक्षक श्रीराम पवार यांना संशयीतांची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
तीन गुन्ह्यांची उकल : आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
अटकेतील आरोपींनी अमोल पाटील यांच्या घरातील घरफोडीची कबुली देत पश्चिम देवपूर हद्दीतील अन्य दोन घरफोड्यांची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून 50 हजा रुपये किंमतीच्या दुचाकीसह एक लाख 14 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सलमानविरोधात देवपूर पोलिसात चार, अफताबविरोधात तीन तर हरीष विरोधात देवपूर पोलिसात तीन, धुळे तालुका व पारोळा पोलिसात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, अंमलदार प्रकाश सोनार, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, संतोष हिरे, आशिषकुमार वानखेडे, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, विवेक वाघमोडे, अमोल पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.



