पाच हजारांची लाच भोवली : धुळ्यातील तहसील कार्यालयाचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
लाचखोर धास्तावले : धुळे एसीबीच्या कारवाईने तहसील वर्तुळात खळबळ
गणेश वाघ
Bribe of ₹5,000 Proves Costly: Supply Inspector at Dhule Tehsildar Office Caught in ACB Net धुळे (3 जून 2026) : ज्वारीचा दर्जा चांगला दाखवत मोजणी करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष महेश बागुल (30, साईछत्र अपार्टमेंट, आरटीओ कार्यालयाजवळ, पेठ रोड, नाशिक) यास धुळे एसीबीने बुधवार, 3 जून रोजी रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धुळे तालुक्यातील अंचाळे गावचे रहिवासी आहेत. त्यांनी शासनाच्या धान्य खरेदी योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये रब्बी हंगामातील ज्वारी धुळ्यातील खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणली होती. धुळे शासकीय गोदामात धान्याची मोजणी केल्यानंतर पावत्या देण्यात आल्या मात्र पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष बागुल यांनी ज्वारीचा दर्जा चांगला दाखवण्यासह ज्वारी मोजून घेण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर बुधवार, 3 रोजी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, सागर माळी, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.



