अवकाळी वादळाने केळीचे नुकसान : आमदार अमोल जावळे यांनी नुकसानीची केली पाहणी
शेतकर्यांच्या जाणल्या व्यथा : शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही
यावल (3 जून 2026) : रावेरसह यावल तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने शेतकर्यांच्या हाता-तोंडातील घास हिरावल्याने केळी उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे. मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पंचनाम्यासोबत शेतकर्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकर्यांना दिले.
शेतकर्यांशी साधला संवाद
पाहणीदरम्यान आमदार जावळे यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळी, कापूस, मका तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी पिके जमिनीवर आडवी पडली असून शेतकर्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचे चित्र दिसून आले.
मन झाले व्यथित
आमदार जावळे म्हणाले की, शेतकर्यांच्या डोळ्यांतील वेदना, उध्वस्त झालेली पिके आणि वर्षभराच्या कष्टांचे झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असून या कठीण प्रसंगी मी शेतकरी बांधवांसोबत खंबीरपणे उभा आहे.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौर्यादरम्यान तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून प्राथमिक माहिती संकलित केली.



