भुसावळ तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीची निवडणूक : 8 जूनपासून आरक्षण सोडत
भुसावळ (4 जून 2026) : भुसावळ तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आणि आरक्षण चक्रानुक्रम (रोटेशन) फिरवण्यासाठी तहसीलदार नीता लबडे यांनी अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यानुसार 8 ते 12 जून या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन करून ही आरक्षण सोडत काढली जाईल. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सन 2024 ते 2026 या काळात मुदत संपणार्या नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हा कार्यक्रम घोषित केला आहे.
आज बैठक
या प्रक्रियेसाठी मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी आणि उपकृषी अधिकारी यांची अध्यासी अधिकारी म्हणून तर तलाठी व ग्रामविकास अधिकार्यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या कर्मचार्यांची पूर्वतयारी बैठक गुरुवार, 4 जूनला सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयाच्या बैठक हॉलमध्ये होईल. दरम्यान, आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी गावांमध्ये दवंडी देणे आणि सूचना फलकावर नोटीस लावणे बंधनकारक आहे. कर्तव्यात कुचराई केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई होईल, असा इशार तहसीलदार नीता लबडे यांनी दिला.
असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
8 जून : विशेष ग्रामसभेची सूचना देणे आणि 8 ते 12 जून दरम्यान आरक्षण सोडत काढणे (अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व महिला आरक्षण).
17 जून : प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला जिल्हाधिकार्यांची मान्यता
19 जून : प्रारुप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करणे
19 ते 25 जून : हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी
3 जुलै : उपविभागीय अधिकार्यांनी हरकतींवर अभिप्राय देणे
8 जुलै : जिल्हाधिकार्यांनी अंतिम अधिसूचनेस मान्यता देणे
10 जुलै : अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देणे.



