पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जवाबदारी घ्यावी : भुसावळातील बैठकीत उमेश नेमाडे

जय गणेश फाउंडेशन आयोजित पर्यावरण जनजागृती बैठक उत्साहात


भुसावळ (4 जून 2026) : पर्यावरणाचा र्‍हास होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येक नागरिकाला जबाबदारी घ्यावी लागेल, असे आवाहन जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी जनजागृती बैठकीत केले. जय गणेश फाउंडेशनने पर्यावरण जनजागृती बैठकीचे आयोजन केले. अध्यक्षस्थानावरून बोलतांना उमेश नेमाडे बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांनी प्रास्ताविक केले.

वृक्षारोपण व्हावी चळवळ
चर्चेत सहभागी होतांना गणेश फेगडे यांनी वृक्षारोपण ही व्यापक चळवळ झाली पाहिजे आणि लागवडीसोबतच वृक्ष संवर्धन जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यासाठी शासन किंवा प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी जबाबदारी घेतली पाहिजे असे सांगितले तर प्रकाश विसपुते यांनी हे कार्य फक्त शहरापुरते मर्यादित न ठेवता गावोगावी पोहचविण्याची गरज असल्याचे सांगितले.

चर्चेत सुनंदा औंधकर यांनी घराजवळील जागांमध्ये झाडे लावून जवळच्या कुटुंबाला संवर्धनाची जबाबदारी द्यावी, असे मत मांडले तर वैशाली सैतवाल यांनी त्यांच्या वृक्ष बँकेतून वृक्ष पुरवण्याची तयारी दर्शवत प्लॅस्टिक निर्मूलनासाठी कापडी पिशव्या वापराबद्दल माहिती सांगितली. भूषण पाठे यांनी देशी झाडेच का लावावीत याचे फायदे सांगून शहरातील अस्ताव्यस्त पडलेल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला तर भूषण वराडे यांनी वृक्षतोड करणारांना प्रतिबंध घातला गेला पाहिजे, अशी मागणी केली. यासोबतच यावेळी चर्चेत नारायण वदडकर, प्रकाश तिडके, तुकाराम बावस्कर यांनीही सहभाग घेऊन मत मांडले. जय गणेश फाउंडेशनचे सचिव तुकाराम आटाळे यांनी आभार मानले.

या पर्यावरण जनजागृती बैठकीत जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ, पतंजली ज्येष्ठ नागरिक संघ, गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ, राधाकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघ, अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ, पर्यावरण सखी मंच, पर्यावरण संवर्धन व विकास समिती, डब्ल्यूईएन संस्था आदी संस्थांचे प्रतिनिधी तसेच बहुसंख्य पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !