विधानपरिषद निवडणूक : जळगावात चौरंगी लढत तर राज्यात 11 जागांवर होणार चुरशीच्या लढती


मुंबई (4 जून 2026) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत माघारीच्या अंतीम दिवशी चित्र स्पष्ट झाले. ठाणे, कोकण, यवतमाळ, वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर येथे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 11 मतदारसंघांत चुरशीच्या लढती रंगणार आहेत. दरम्यान, जळगावातही चौरंगी लढत रंगणार आहे.

बाळ माने यांची हकालपट्टी
अर्ज माघारीच्या प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. या घडामोडीनंतर ठाकरे गटाने बाळ माने यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करत त्यांची हकालपट्टी जाहीर केली.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर प्रदीप कंद तसेच महाविकास आघाडी समर्थित श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. ठाणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले.

यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांच्यानंतर सय्यद फारुख यांनीही माघार घेतल्याने शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. तर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचे अरुण लखाणी बिनविरोध निवडून आले.

नाशिक मतदारसंघात मात्र शेवटपर्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपचे गणेश गीते यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात थेट सामना होणार आहे. सांगली-सातारा मतदारसंघात शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी माघार घेतल्याने भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

जळगावात होणार चौरंगी लढत
जळगाव मतदारसंघातही अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने चित्र काहीसे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार आसिफ मोहम्मद, सुनील जंगले, प्रवीण पाटील यांच्यासह अपक्ष कलीम मणियार, ठाकरे गटाचे निलेश चौधरी आणि शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर दीपक धांडे यांनी माघार घेतली. मात्र शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे मैदानात कायम आहेत त्यामुळे भाजपचे नंदकिशोर महाजन, ठाकरे गटाचे शरद तायडे आणि रेश्मा काळे, अपक्ष अनिल चौधरी यांच्यात चौरंगी लढत होईल.

सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात सरळ सामना रंगणार आहे. नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर आणि काँग्रेसचे रामदास पाटील आमनेसामने असतील. नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात लढत होणार आहे.

अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षदीप देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान, ठाकरे गटाचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. तर धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट सामना होणार आहे.

राज्यातील अर्ज माघारीनंतरची राजकीय परिस्थिती पाहता महायुतीने अनेक ठिकाणी बंडखोरी नियंत्रणात आणत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला काही मतदारसंघांत माघारीचा फटका बसला आहे. आता उर्वरित 12 मतदारसंघांतील लढतींवर सर्वांचे लक्ष लागले असून या निवडणुकीचे निकाल आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरणार आहेत.

राज्यातील पाच जागा बिनविरोध झाल्याने महायुतीने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. मात्र उर्वरित 12 जागांवरील निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाची खरी परीक्षा आता मतदानातून होणार आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !