रावेर-यावल तालुक्याला पुन्हा वादळाचा तडाखा : आमदार अमोल जावळे उद्या करणार पाहणी
रावेर (4 जून 2026) : रावेर मतदार संघातील रावेर आणि यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवार, 4 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळी वार्यासह मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळी बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नुकसानीची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी तातडीने दखल घेत महसूल, कृषी व संबंधित प्रशासनाला उद्या सकाळपासून नुकसानग्रस्त भागांमध्ये त्वरित पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा मिळावा आणि कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण व पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, आमदार अमोल जावळे हे शुक्रवारी सकाळी नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकर्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेणार असून शासनाकडून योग्य ती मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत.



