भुसावळात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप
शहरवासीयांना दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
भुसावळ (5 जून 2026) : शहरातील वाढते तापमान, वृक्षांची होणारी कत्तल आणि नागरिकांकडून प्लास्टिक कॅरीबॅगच्या होणार्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा समतोल खालावला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहरात श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने शुक्रवार, 5 जून रोजी सकाळी 6.30 वाजता अष्टभुजा मंदिर समोर प्रभात फेरीतील सर्व सदस्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
पर्यावरण संतुलनाचा संदेश
सध्याच्या काळात प्लास्टिक कचर्यामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्याला पर्याय म्हणून प्रत्येकाने कापडी पिशवीचा वापर करणे काळाची गरज बनली आहे तसेच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या उपक्रमाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी ’श्री राधाकृष्ण प्रभात फेरी’चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभात फेरीच्या या स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.




