निजामपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी जाळ्यात

भामरेसह जामद्यातील संशयीतांकडून सहा लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


Bold action by Nizampur police ; gang that swindled people by promising to double their money falls into the net. साक्री (6 जून 2026) : धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलिसांनी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक, मारहाण व लूटमार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून एकूण सहा लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेनंतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एमपीच्या शिक्षकाला लावला चुना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 1.45 वाजता साक्री तालुक्यातील पवन चक्कीजवळ तक्रारदार व व्यवसायाने शिक्षक असलेल्या अनिल उमरावसिंह बोडाणा (35, रा. रूपाखेडी, लाल माता मंदिरासमोर, ता. तराणा, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) यांना काही व्यक्तींनी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून बोलावले. त्यानंतर त्यांच्या गळ्याला चाकू लावून रोख रक्कम, चांदीची चेन, मोबाईल फोन व इतर साहित्य जबरदस्तीने हिसकावून घेतले. तसेच त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

आरोपींना अटक : मुद्देमालही जप्त
पोलिसांनी मुकेश प्रकाश भामरे (35, रा.भामरे, ता.साक्री), जोगलेश लली चव्हाण (20, जामदा, ता.साक्री), नागेश नवशा चव्हाण (21, जामदा, ता.साक्री, जि.धुळे) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 26 हजारांची रोकड, दोन हजार रुपये किंमतीची एअर गन, तीन लाख 75 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा 25 ग्रॅम वजनाचा गोफ, सव्वा लाखांचे चांदीचे कडे, 30 हजार रुपये किंमतीच्या दोन रिंगा, 15 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा एक ग्रॅमचा तुकडा, 500 रुपये किंमतीचा रॉड, आठ हजार रुपये किंमतीचे पैसे मोजण्याचे मशीन, 500 रुपये किंमतीचा बटणाचा चाकू, 78 हजार रुपये किंमतीचे आठ मोबाईल व नकली नोटांचे बंडल असा एकूण सहा लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मयूर भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियदर्शनी थोरात, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, पोलीस अंमलदार नारायण मालचे, रतन मोरे, नागेश्वर सोनवणे, प्रतीक आखाडे, दीपक महाले, राकेश महाले, पृथ्वीराज शिंदे, सुजित देवरे, कृष्णा भील, परमेश्वर चव्हाण, प्रवीण पवार, अर्जुन पवार, टिलू पावरा, महिला पोलीस अंमलदार गोदावरी बागुल तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल पाटील आणि अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !