नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कामगिरी : दोन मंदिरांमधील चोरीचा गुन्हा 24 तासांत उघड
Major achievement by Nandurbar City Police : Theft cases at two temples solved within 24 hours. नंदुरबार (6 जून 2026) : नंदुरबार शहरातील रोकडेश्वर हनुमान मंदिर, कुंभार गल्ली तसेच देसाईपुरा येथील श्री महालक्षेश्वर शिवालय मंदिरात चोरी झाल्यानंतर भाविकांमध्ये रोष वाढला होता मात्र नंदुरबार शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावत आरोपीला बेड्या ठोकत चोरी केलेला मुद्देमालही परत मिळवला आहे. राहुल दिलीप पाडवी (19, नवनाथ नगर, देसाईपुरा भिलाटी, नंदुरबार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
दोन मंदिरांमध्ये चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, 4 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिरांमधून पितळ धातूची घंटा (किंमत 5,400 रुपये), तांब्याच्या धातूची 16 किलो वजनाची नाग देवतेची मूर्ती (किंमत 16 हजार रुपये) तसेच बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल (किंमत 50 हजार रुपये) असा एकूण 71 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे स्थानिक आरोपीला अटक करीत मुद्देमाल जप्त केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण, भनेश मराठे, हवालदार जगदीश पाटील, हवालदार नरेंद्र चौधरी, कॉन्स्टेबल नरेंद्र पाडवी, कॉन्स्टेबल राहुल राठोड, हवालदार अमित भरवाड, कॉन्स्टेबल रूपेश पगारे, ललित गवळी, विवेक ठाकरे, अनिल वसावे, विघ्नेश्वर बिरारी, महिला पोलीस कॉन्स्टेबल निंबाबाई वाघमोडे आदींच्या पथकाने केली.



