वडापावसह समोसा आणि तत्सम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रांच्या कागदात विकल्यास होणार कठोर कारवाई : तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये
पुणे (7 जून 2026) : अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा हाती घेणार्या तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यपदार्था विक्रेत्यांकडे मोर्चा वळवला आहे. कचोरी, समोसा, वडे तसेच तत्सम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विक्री करणार्यांवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याबाबत स्वतंत्र आदेशच काढण्यात आले असून अन्न व औषध प्रशासन विभाग आता कारवाईसाठी सज्ज झाला आहे.
पथकांकडून होणार छापेमारी
तुकाराम मुंढे यांची प्रतिमा आणि कठोर शिस्त पाहता इतर सरकारी निर्णयांप्रमाणे या आदेशात सेटलमेंट होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे आता समोसा आणि वडापाव विकणार्यांना लवकरात लवकर वर्तमानपत्राच्या कागदाला पर्याय शोधावा लागणार आहे. तसे न केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई अटळ आहे. तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा वडापाव आणि समोसा विक्रेत्यांकडे वळवला आहे.
विक्रेत्यांचे दणाणले धाबे
वर्तमानपत्रात -खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशी सक्त ताकीद अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागामार्फत सर्व विक्रेत्यांना दिल्यानंतर विक्रेत्यांचें धाबे दणाणले आहेत.
वर्तमानपत्रावरील शाई आरोग्यास घातक
खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करीत असताना अनेक ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ खासकरून वडापाव-भजीपाव दिले जात असल्याचे तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आले. वास्तविक वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास पूर्वीपासून बंदी आहे. वर्तमानपत्रांच्या छपाईच्या शाईमधील शिसे, झिंक, कॅडमियन मानवी आरोग्यास घातक आहे.



