भुसावळ तालुक्यात भीषण अपघात : अवैध वाळूच्या डंपरने युपीच्या मजुराला चिरडले


Horrific accident in Bhusawal Taluka : Illegal sand dumper runs over laborer from up भुसावळ (7 जून 2026) : जळगाव जिल्ह्यात महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठली आहे. रोजगारानिमित्त युपीतून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुराला अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या डंपरने चिरडून पळ काढल्याची घटना भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील सुदर्शन पेपर अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स कंपनीसमोर 4 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. अपघात प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राजाभैय्या नत्थू (38, मूळ रा.धरदुवा, जिल्हा बांधा, उत्तर प्रदेश, सध्या मुक्काम सुदर्शन पेपर मिल, ता.भुसावळ) असे मृताचे नाव आहे.

अशी घडली घटना
राजाभैय्या हा पोटाची खळगी भरण्यासाठी युपीतून सुदर्शन मिलमध्ये कामाला लागला होता. 4 रोजी रात्री तो कंपनीच्या आवारात झोपला असताना अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर )एम.एच.19 झेड.8388) आला व त्या डंपरने झोपलेल्या अवस्थेत मजुराला पहाटे अंदाजे 2.50 वाजेच्या सुमारास वाहन मागे घेण्याच्या प्रयत्नात चिरडले.

अपघातानंतर वाहनासह चालक पसार
यावेळी झोपलेल्या अवस्थेतील राजाभैय्या नत्थू यांच्या डाव्या खांद्यावर व मानेवरून डंपरचे टायर गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर चालकाने जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी अथवा घटनेची माहिती कोणालाही न देता घटनास्थळावरून डंपरसह पलायन केले. अनोळखी चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या ऑनलाईन प्रणालीची कनेक्टिव्हिटी बंद असल्यामुळे गुन्हा नोंदविण्यास विलंब झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडून तपास सुरू असून डंपर चालकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !