500 रुपयांची लाच भोवली : धडगाव पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
₹500 Bribe Costs Dearly : Junior Assistant at Dhadgaon Panchayat Samiti Caught in ACB Trap भुसावळ (8 जून 2026) : सिंचन विहिर मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम मंजूर करून विस्तार अधिकार्‍याची स्वाक्षरी आणून देण्याच्या मोबदल्यात पाचशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यकाला नंदुरबार एसीबीने अटक केली आहे. खाअल्या सिंगा पाडवी (45) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
या प्रकरणातील मूळ तक्रारदार 30 हे अशिक्षित आहेत तर त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2025 वैयक्तिक सिंचन विहिर मंजूर करण्यात आली होती. धडगाव पंचायत समितीने या विहिरीच्या कामासाठी चार लाख 99 हजार 661 रुपयांचे अनुदान मंजूर केले होते व एक लाख 62 हजार 604 रुपयांचे प्रलंबित अनुदानाचा प्रस्ताव पंचाय समिती, धडगाव येथे प्रलंबित होता.

तक्रारदाराला त्याच्या काकांनी प्रस्तावाची चौकशी करण्याकामी धडगाव पंचायत समितीत 3 रोजी पाठवल्यानंतर कनिष्ठ सहाय्यक खाअल्या पाडवी यांनी विस्तार अधिकारी यांची स्वाक्षरी आणून देण्याच्या मोबदल्यात व पाचशे रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. सोमवारी सायंकाळी उशिरा तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास लोंढे, हवालदार विजय ठाकरे, हवालदार हेमंतकुमार महाले, जितेंद्र महाले, सुभाष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.

लाच मागितल्यास करा तक्रार
नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !