खाण्यासाठी खिचडी न दिल्याने जळगावात प्रौढाला संपवले : एका आरोपीला अटक
Adult man killed in Jalgaon after being denied khichdi ; one accused arrested. जळगाव (9 जून 2026) : खाण्यासाठी खिचडी मागितल्यानंतर ती न दिल्याच्या क्षुल्लक वादातून जळगावात 40 वर्षीय प्रौढाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवार, 8 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. जीवन शालिक पाथकर उर्फ जीवन मिस्तरी (40, मूळ रहिवासी रोटवद, ता. जामनेर, ह.मु.शामनगर, जळगाव) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे तर संशयीत अंकुश नथ्थू पाटील (46, समता नगर, जळगाव) यास रामानंद पोलिसांनी अटक केली आहे.
दगडाने ठेचून केली हत्या
जीवन मिस्तरी हे गेल्या 15 वर्षांपासून जळगावात राहत होते. आईच्या निधनानंतर पत्नीने त्यांची साथ सोडली तर मुलानेही वेगळा संसार थाटल्याने ते एकटेच राहत होते मिळेल ते काम करून गुजराण करीत होते. सोमवार, 8 जून रोजी शामनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ एक रक्ताळलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह नागरिकांना आढळला.त्यानंतर पोलीस कर्मचारी जितेंद्र राजपूत आणि अजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
संशय अन् हत्या उघड
मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असतानाच मयताचा भाचा तुषार राजेंद्र सुतार (28) याला या घटनेची माहिती मिळाली. त्याने जिल्हा रुग्णालयात जाऊन मृतदेह पाहिला असता, तो त्याच्या मामाचा म्हणजेच जीवन पाथकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तुषारने मामासोबत राहणार्यांवर संशय व्यक्त केला. प्राथमिक तपासात संशयीत अंकुश पाटील याने जेवण्यासाठी खिचडी मागितल्यानंतर ती न दिल्याच्या क्षुल्लक वादातून जीवन यांना बेदम मारहाण केली आणि ते खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात सिमेंट काँकिे्रटचा दगड घालून त्यांची हत्या केल्याचे समोर आले.
आरोपीला अटक : खुनाचा गुन्हा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अजित पाटील, जितेंद्र राजपूत, सुधाकर अंबुरे आणि सुशील चौधरी यांच्या पथकाने तातडीने कारवाई करीत आरोपी अंकुश पाटील (46) यास अटक करीत त्याच्याविरोधात तुषार सुतार यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.



