अधिकमासानिमित्त जावयासाठी धोंड्यात आणलेली अंगठी मांजराने गिळली ; शस्त्रक्रियेअंती मिळाला ‘खजिना’


Cat swallows ring bought for son-in-law during Adhik Maas ; ‘treasure’ recovered after surgery बीड (9 जून 2026) : अधिक मासाच्या पर्वणीनिमित्त सर्वत्र जावयाला गोड-धोड खावू घालण्यासोबतच धोंड्याचा मान दिला जात आहे मात्र धोंड्यानिमित्त वाणात आणलेली सोन्याची अंगठीच चक्क मांजराने गिळल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील टाकरवण परिसरातील गावात घडली. या घटनेने कुटूंबिय चिंतेत पडले तर चार दिवसानंतरही मांजराकडून अंगठी मिळत नसल्याने अखेर मांजराला उलटी होण्याचे औषध देण्यात आले मात्र या घटनेत मांजराचा मृत्यू झाला व अखेर गिळलेली अंगठी परत मिळाली. या अजब-गजब घटनेची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे.

काय आहे प्रकरण ?
अधिक मासानिमित्त लेक आणि जावयाला धोंडे जेवणासाठी सासुरवाडीत बोलावण्यात आले. जावईबापूंचा मान राखण्यासाठी सासूबाईंनी खास पाच ग्रॅम सोन्याची अंगठी तयार करून घेण्यात आली व जावयाला सरप्राईज देण्यासाठी ही अंगठी एका पिठाच्या धोंड्यात लपवून ठेवण्यात आली होती. घरात पाहुण्यांची लगबग आणि स्वागताची तयारी सुरू असतानाच घरातील मांजराने अंगठी असलेला धोंडा गट्टम केला. काही क्षणांतच अंगठी गायब झाल्याचे लक्षात येताच घरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी मांजराला पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवले मात्र तोपर्यंत अंगठी त्याच्या पोटात गेली होती.

पारंपरिक आहेरावर जावयाची बोळवण
घरातील गडबड पाहून जावईबापूंनी चौकशी केली असता त्यांना संपूर्ण प्रकार सांगण्यात आला. अखेर अंगठी नंतर देण्याचे आश्वासन देत त्यांचा मान राखण्यात आला आणि पारंपरिक आहेर देऊन त्यांची बोळवण करण्यात आली.

यानंतर अंगठी परत मिळविण्यासाठी कुटुंबीयांनी चार दिवस मांजरावर बारकाईने लक्ष ठेवले मात्र अंगठीचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर पशुवैद्यकांचा सल्ला घेण्यात आला. मांजराला उलटी होण्यासाठी औषधोपचार करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया करून मांजराच्या पोटाची तपासणी करण्यात आली. यावेळी सर्वांच्या प्रतीक्षेचा शेवट करत सोन्याची अंगठी सुरक्षित अवस्थेत मिळून आली. अंगठी परत मिळाली असली तरी एका मुक्या जीवाचा बळी गेल्याने कुटुंबीयांनी हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, जावयाच्या बोटात जाण्याऐवजी अंगठी थेट मांजराच्या पोटात गेल्याने गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. जावयाचा सोन्याचा आहेर मांजरानेच स्वीकारल्याची मिश्कील प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !