भुसावळात प्लॅटफार्मवर पडलेल्या वड्यांची प्रवाशांना विक्री ; रेल्वे प्रशासनाकडून स्टॉल सील
निकृष्ट खाद्यपदार्थाचा मुद्दा ऐरणीवर : रेल्वे स्थानकावरील ठेकेदारांचे दणाणले धाबे ; विक्रेत्याला घेतले ताब्यात
भुसावळ (9 जून 2026) : सोशल मिडीयातील व्हायरल व्हिडिओनंतर भुसावळ रेल्वेस्थानकावरील संतापजनक प्रकार समोर आला होता. एका विक्रेत्याकडील वडे जमिनीवर पडल्यानंतर त्याने ते आवरत पुन्हा विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार घडला व एका प्रवाशाने याचे चित्रीकरण करीत हा व्हिडिओ व्हायरल केला. पाहता-पाहता शेकडो प्रवाशांकडून विविध ग्रुप्सवर हा व्हिडिओ फिरल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. व्हिडिओतील चित्रीकरणाद्वारे विक्रेत्याची ओळख पटवल्यानंतर आरपीएफने या विक्रेत्याला ताब्यात घेतले तसेच स्टॉलही प्रशासनाने तत्काळ सील केला तर आता ठेकेदारावरील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे झाली ओळख
सोशल मिडीयावर तुफान व्हायरल व्हिडिओ थेट भुसावळचे डीआरएम पुनीत अग्रवाल यांच्यापर्यंत पोहोचला व रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत भुसावळ स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामधून संबंधित विक्रेत्याची ओळख पटविण्यात आली आणि त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले.
ठेकेदाराचा दावा : ‘त्या’ वड्यांची विक्री नाही
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित विक्रेता मोईन पाशा (भुसावळ) हा रेल्वे स्थानकातील अधिकृत विक्रेता आहे व त्याला नोटीस बजावल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार, खाली पडलेल्या वड्यांची विक्री करण्यात आलेली नाही व ते वडे फेकून देण्यात आले मात्र रेल्वे प्रशासनाने आता विक्रेत्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देत कायदेशीर कारवाई केली आहे तर संबंधित स्टॉलला सील ठोकण्यात आले आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओतील प्रकारामुळे भुसावळ रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रवाशांच्या तक्रारीअंती विक्रेत्यावर कठोर कारवाई
भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पुरवणे हे रेल्वे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. स्थानकावरील खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबत प्राप्त झालेली तक्रार अत्यंत गांभीर्याने घेण्यात आली आणि संबंधित अधिकार्यांना त्वरित चौकशी व आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. स्थानक परिसरात कार्यरत असलेल्या सर्व अधिकृत विक्रेत्यांना विहित स्वच्छता मानके, गुणवत्तेचे निकष आणि परवान्याच्या अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करताना आढळणार्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा विक्रेत्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने कळवले आहे.


