भुसावळात कोम्बिंग : गावठी, कट्टा तलवारी, चॉपरसह सहा संशयीत जाळ्यात
23 वाहने जप्त : 54 हिस्ट्रीशीटरची तपासणी : हद्दपार आरोपीही जाळ्यात
गणेश वाघ
Combing operation in Bhusawal : Six suspects netted with country-made firearms, a pistol, swords, and choppers भुसावळ (10 जून 2026) : शहर व विभागातील वाढत्या गुन्हेगारीला ठेचण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बुधवार, 10 रोजी पहाटे पाच ते आठ दरम्यान कोम्बिंग राबवण्यात आले. पसार, हद्दपार तसेच वॉण्टेड आरोपींच्या घरावर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली तर संशयीत वाहनांचीदेखील कसून तपासणी करण्यात आली. चार वेगवेगळ्या संशयीतांकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस तसेच दोन तलवारी व अन्य एक चॉपर जप्त करण्यात आला तसेच खंडवा लोहमार्ग पोलिसांना वॉण्टेड इराणीसह एका हद्दपार आरोपीच्या मुसक्या बांधण्यात आल्याची माहिती जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी भुसावळात बुधवार, 10 रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शस्त्र बाळगणारी चौकडी जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अपर अधीक्षक संदीप गावीत यांनी कारवाईची माहिती देताना सांगितले की, कोम्बिंगदरम्यान समीर शहा जब्बार शहा (दिनदयाल नगर, भुसावळ) याच्या ताब्यातून गावठी कट्टा व काडतूस जप्त करण्यात आले तर शम्मी प्रल्हाद चावरीया व दानिश शेख शकील यांच्या ताब्यातून तलवार तसेच अनिल टाक याच्या ताब्यातून कोयता (चॉपर) जप्त करण्यात आला. चौकडीविरोधात स्वतंत्र आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल करण्यात आले.
वॉण्टेडसह हद्दपार आरोपी जाळ्यात
कारवाईदरम्यान संदीप बुधा खंदारे (भुसावळ) हा वर्षभरासाठी हद्दपार असतानाही शहरात आढळल्याने त्यास ताब्यात घेवून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर इराणी वस्तीत कारवाईदरम्यान सल्तनत अली इराणी (पापानगर, भुसावळ) आढळल्याने त्यास खंडवा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
63 संशयीतांच्या घराची झडती : 23 वाहने जप्त
अपर अधीक्षक गावीत म्हणाले की, कोम्बिंग दरम्यान एकूण 63 संशयीतांच्या घराची झडती घेण्यात आली व या माध्यमातून 99 आरोपींना तपासण्यात आले. रेल्वे स्टेशन, बसस्थानक व लॉजेसची कसून तपासणी करण्यात आली. पोलिसांनी कारवाईदरम्यान 112 वाहनांची तपासणी करून 23 संशयीत वाहने ताब्यात घेत जप्त केली तर 54 हिस्ट्रीशीटर तपासण्यात आले. जप्त वाहनांच्या कागदपत्रांची खातरजमा केली जाणार असून या माध्यमातून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चोपडा शहर हद्दीतील चोरीची दुचाकी जप्त
शहरातील मच्छीवाडा परिसरात पोलिसांना दुचाकी (एम.एच.18 बी.डब्ल्यू.6155) ही दुचाकी आढळल्याने ती जप्त करण्यात आली आहे. ही दुचाकी चोपडा शहर हद्दीतून चोरी गेल्याचे स्पष्ट झाले असून ती चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. दरम्यान, भुसावळ तालुका हद्दीतील शिवपूर कन्हाळा येथे अवैधरित्या दारू विक्री करणार्या तीन विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली व एक लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
यांचा कोम्बिंगमध्ये समावेश
या विशेष कोंबिंग ऑपरेशनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, शहर निरीक्षक उद्धव डमाळे, भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, मुक्ताईनगर निरीक्षक आशिष अडसूळ, बोदवड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आशिष लवंगडे यांच्यासह 20 प्रभारी दुय्यम अधिकारी, गुन्हे शाखेचे 45 अंमलदार, जळगाव परिमंडळातील 111 पोलीस अंमलदार, शहर वाहतूक शाखेचे 27 अंमलदार व 15 महिला अंमलदारांचा सहभाग होता.


