जळगाव एमआयडीसी पोलिसांचा गुटखा माफियांना दणका ; 22 लाखांचा विमल गुटखा जप्त
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई ; धरणगावचा चालक ताब्यात : पुरवठादारांवरही गुन्ह्याची अपेक्षा
Jalgaon MIDC Police deal a blow to gutkha mafia; ‘Vimal’ gutkha worth ₹22 lakh seized जळगाव (10 जून 2026) : राज्यसात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची जळगावातून महामार्गाद्वारे वाहतूक होणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत सुमारे 22 लाखांचा गुटखा जप्त केला. या कारवाईने तस्कर हादरले असून आता पुरवठादारांवरही कारवाईची अपेक्षा आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना प्राप्त झाल्यानंतर पथकाला निर्देश देण्यात आले. पथकाने 9 रोजी अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या डिझो पेट्रोलपंप परिसरात संशयित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.19 सी.एक्स 3260) मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल सुगंधित गुटखा व पानमसाला आढळल्याने तो जप्त करण्यात आला.
गुटख्यासह वाहन जप्त
पथकाने या कारवाईत 21 लाख 61 हजार 600 रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला तसेच सात लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन मिळून 28 लाख 61 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात वाहन चालक जोगेंद्र भीका पाटील (रा.फुलपाट, ता.धरणगाव, जि.जळगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, एएसआय विजयसिंग पाटील, हवालदार गिरीश पाटील, हवालदार लाडवंजारी आदींच्या पथकाने केली.


