तपतकठोरानजीक डंपरने चिरडल्याने वृद्धाचा मृत्यू : जमावाने डंपर पेटवला
Elderly man crushed to death by dumper near Tapatkathoran ; mob sets dumper on fire वरणगाव (10 जून 2026) : रस्ता कामासाठी लागणारी गिट्टी वाहून नेणार्या डंपरच्या धडकेने 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू ओढवला तर सुदैवाने नात बचावली मात्र या अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरच पेटवला. ही धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा गावाजवळील पिंप्रीसेकम शिवार रस्त्यावर सोमवारी सकाळी घडली. वरणगाव पोसिात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आनंदा मुकुंद पाटील (55, तपतकठोरा) असे मृताचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
तपतकठोर्याचे रहिवासी आनंदा मुकुंद पाटील (55) हे आपल्या चार वर्षांच्या नातीसोबत पिंप्रीसेकम शिवारातील शेतातून दुचाकी (एम.एच. 19 बी 9320) ने घरी परतत होते. त्याच वेळी रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू असलेला डंपर (एम.एच. 19 ई.यू. 3737) हा अरुंद रस्त्यावर मागे येत होता व या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आनंदा पाटील हे डंपरखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला मात्र त्यांच्या बाजूला बसलेली लहान नात परी ही प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावली. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि डंपरखाली अडकलेली दुचाकी तसेच मृतदेह बाहेर काढून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर आनंदा पाटील यांना मृत घोषित केले.
ग्रामस्थांनी पेटवला डंपर
दुर्दैवी घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित डंपरला आग लावून पेटवून दिला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


