यावल तालुक्यातील 32 वर्षीय महिलेवर बलात्कार : खंडणीही मागितली
यावल (11 जून 2026) : यावल तालुक्यातील एका गावातील 32 वर्षीय महिलेशी जीवनसाथी डॉट कॉम वर बुलढाणा येथील तरुणाने ओळख निर्माण केली नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अनेक ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला न कळता त्याची व्हिडिओ शूटिंग केले आणि नंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून खंडणी मागितली. मंगळसूत्र गहाण ठेवून 74 हजारांची खंडणी आरोपीने स्वीकारली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण
एका गावातील 32 वर्षीय महिलेने फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिची ओळख जीवनसाथी डॉट कॉमवर तुषार सिद्धार्थ तायडे (रा.गौतम नगर, सुंदर खेड, जि.बुलढाणा) याच्याशी झाली. या तरुणाने महिलेस लग्नाचे आमिष दाखवले व नंतर तिला फैजपूर, भुसावळ, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, फर्दापुर आणि बुलढाणा येथे लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. नाजूक प्रसंगाचे महिलेच्या नकळत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. नंतर सदर व्हिडिओ रेकॉर्डिंग तुझ्या पतीला दाखवेल, सोशल मीडियावर व्हायरल करेल, असे धमकावून तिच्याकडून तीन लाखाची खंडणी मागितली व खंडणी पोटी महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून 74 हजार रुपये घेतले.
ही घटना 10 जून 2025 पासून ते 16 मे 2026 दरम्यान घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात महिलेच्या फिर्यादीवरून तुषार सिद्धार्थ तायडेविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.


