यावल तालुक्यातील दाम्पत्याचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू
सातपुड्याच्या कुशीतील माथन पाड्यावरील घटना : यावल पोलिसात नोंद
Couple from Yaval Taluka drowns in a water pool यावल (11 जून 2026) : सातपुड्याच्या कुशीतील माथन आदिवासी पाड्यावरील दाम्पत्याचा बाजारातून घरी जाताना गाड्रर्या शिवारातील नदीच्या डोहात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दाम्पत्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाय घसरून पडल्याने मृत्यू
सातपुड्याच्या कुशीत माथन हा आदिवासी पाडा आहे. या पाड्यावरील रहिवासी असलेले थावरा उर्फ भावर्या रजान पावरा (54) व त्यांची पत्नी धोंडीबाई थावरा उर्फ भावर्या पावरा (32) हे दांपत्य मंगळवारी बाजार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी मद्य प्राशन केल्याचा संशय आहे व रात्री घरी परतत असतांना गाड्रर्या शिवारातील पाच्या पावरा यांच्या शेताजवळील नदीच्या डोहात रस्त्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाय घसरून डोहात बुडाले.
दोघांचा मृतदेह हा बुधवारी तेथे नागरीकांना आढल्यानंतर या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.


