अमळनेरात मध्यरात्री प्रांताधिकार्‍यांचा छापा : वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले

हिंगोणे शिवारात 30 ब्रास वाळूचा साठा पकडला


Sub-Divisional Officer raids Amalner at midnight; two sand-laden tractors seized अमळनेर (14 जून 2026) : वाळूचे ठेके बंद झाल्यावरही जळोद येथून तापी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी 13 रोजी पहाटे 1 वाजून 15 मिनिटांनी छापा टाकून दोन ट्रॅक्टरवर कारवाई केल्याने अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
अमळनेर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी 13 रोजी मध्यरात्री गोपनीय माहिती मिळताच स्थानिक तलाठ्याला न कळवता कुर्‍हे खुर्द येथील ग्राममहसूल अधिकारी अमोल पाटील यांना सोबत घेऊन जळोद येथील तापी नदी पात्रात छापा टाकला. यावेळी नितीन चंद्रशेखर पाटील (अमळगाव) हा ट्रॅक्टर (एम.एच.19 डी.व्ही.4622) आणि जळोद येथील पंकज रवींद्र सावळे हा विना नंबरच्या ट्रॅक्टरने जळोद ते खवशी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करताना आढळला.



उपविभागीय अधिकारी भंगाळे यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व पळासदळे येथील ग्राम महसूल अधिकारी पी.एस.केदार यांना बोलावून दोन्ही ट्रॅक्टरचा पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले. दोन्ही ट्रॅक्टरवर कायदेशोर कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुराणा यांनी सांगितले.

30 ब्रास वाळूचा साठा जप्त
बोरी नदीपात्रातील फापोरे, हिंगोणे गावात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच शनिवार, 13 रोजी दुपारी प्रांताधिकारी मयूर भंगाळे आणि ग्राम महसुल अधिकारी अमोल पाटील यांनी अचानक छापा टाकला. यावेळी नदी पात्रात उत्खनन करणारे पळून गेले मात्र घटनस्थळी सुमारे 30 ब्रास वाळू साठा आढळला. अमळनेर शहराचे मंडळाधिकारी धनराळे यांनी वाळू साठ्याचा पंचनामा करून त्याची ताबा पावती तेथील पोलीस पाटील आणि कोतवाल यांच्या ताब्यात देऊन साठ्यावर लिलाव होईपर्यंत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.

अवैध वाळू वाहतूकदारांवर नियमित कारवाई
अमळनेर तालुक्यात कोठेही अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे कळताच कठोर कारवाई केली जाईल, असे प्रांत मयूर भंगाळे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !